Why Senior Citizens should do Yoga?

Language: Marathi

Read Time : 10 mins

अनेक जेष्ठांच्या मनामध्ये योगा विषयी बरेच प्रश्न असतात.. जसं की साठीनंतर योगा करणे शक्य आहे का? आणि योगा या वयामध्ये करण योग्य राहील का? त्याचा मला फायदा होइल का? किंवा काय फायदे आहेत योगाचे आता या उतार वयात?  किंवा आजवर जर कधीच योगा केला नसेल तर आता काही भलतच नको व्हायला ??

काहींना एखादी व्याधी असेल तर डॉक्टर, घरची मंडळी किंवा मित्र परिवार खूप आग्रह करत असतात आणि अश्या वेळी अगदी हमखास पडणारा प्रश्न असतो की जे औषध गोळ्यांनी नाही झालं ते योगाने बरं होईल का..?

सामान्यतः योग म्हणजे आसन अशी समजूत असते.. खरतर योग म्हणजे फक्त आसन न्हवे.. तर आठ पायऱ्यांची इमारत आहे.. ज्याची तिसरी पायरी आसनाची आहे. योग आपल्याला समाजातल राहणीमान कसे असावे.. आपण वयक्तिक रित्या समाजात कसं वावरावे हे यम आणि नियम यातून सांगितले आहे . योग ह्या शब्दातच युती आली .. शरीराची आणि मनाची. शाररिक स्वास्थ्यसाठी आसन. त्यानंतर मग मनावर परिणामकारक असे प्राणायाम , प्रत्याहार मग धारणा ध्यान आणि समाधी असा हा मार्ग आहे. 

योग साधना ही कुठल्या ही वयात तुम्ही करू शकता. त्याला वयाचे बंधन नाही. बंधन असलच तर ते तुमच्या सध्याच्या शाररिक परिस्थितीच आणि मानसिक स्वास्थ्याच. कुठल्याही वयाच्या  साधकाला परिणाम करक अशी योग साधना असते. परिणाम हा व्यक्तीगत असून प्रत्येकाच्या या साधने वरच्या विश्वासावर आणि सरावावर अवलंबून असतो. 

तुम्ही कधीच या मार्गावर आला नसाल तर शरीराला सवय करण्या साठी सुरवात पूरक हालचाली पासून करू शकता. त्यानंतर सोपे सोपे आसन करू शकता. तुम्हाला एखादी व्याधी असेल तर तुम्हाला काही आसन आणि काही प्राणायामाचे प्रकार तुम्हाला करणे शक्य होणार नाही किंवा केले जरी तरी प्रतिबंधित स्वरूपात करू शकाल. जर तुमचा मन विचलित असेल, तणाव ग्रस्त असेल तरी पण काही आसनात स्थिरता यायला वेळ लागेल..  पण जसे जसे तुमचा या साधनेचा सराव वाढेल तसे तसे तुमचा विश्वासा वाढेल आणि तसा तसा तुम्हाला या साधनेचा परिणाम पण दिसून येईल. 

अनेकांना साठी नंतर कुठली ना कुठली शरीराबद्दल ची तक्रार ही असतेच असते.. 

काही ज्येष्ठ त्यावर अती औषध उपचार पद्धती वापरतात तर काही समग्र दृष्टीकोनाने योग साधनेच्या मार्गावर येतात तर काही कुठला मार्ग स्वीकारावा या दुविधेत असतात. 

या दुविधेतल्या लोकांच मन योग साधने कडे वळवण्यासाठी काही शरीरांतर्गत होणारे फायदे सांगायच झाले तर ते अनेक आहेत. 

वयानुसार कॉग्निटीव (संज्ञानात्मक) क्षमता आणि तोल कमी होते जात असतो. तसाच शारारिक बळ पण कमी होते. त्याच बरोबर सांध्यांची, स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. रोग प्रतिकारशक्ती कमी होते. 

वरील सर्व गोष्टींवर योगासन बळकटी आणि लवचिकता देतात, पण त्यासाठी नियमीत सराव गरजेचा.  काही तोलात्मक आसन तुम्हाला तोल आणि आत्मविश्वास देतात. कपालभाती, प्राणायाम, त्राटक क्रिया ह्या तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवतात ज्यामुळे तुमची कॉग्नितिव क्षमता सुव्यवस्थित राहायला मदत मिळते. श्वसनाच्या अभ्यासाने श्वसन केंद्राची क्षमता वाढून रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते.  पण हे सगळे पहिल्या दिवस पासून नाही करता येत. क्रमानी जावे लागते आणि तज्ञ शिक्षकाच मार्गदर्शन घ्यावे लागते. 

ज्येष्ठांना शरारीक तक्रारीं बरोबरच झोप न येणे, मल विसर्जन नीट आणि नियमित न होणे, भूक न लागणे अशा देखील तक्रारी बराच तणाव निर्माण करत असतात.

योग साधना करायला सुर्वात केल्यावर शरीराची हालचाल व्हायला लागते तश्या ह्या तक्रारी देखील कमी होत नाहीश्या होतात. शरीराची हालचाल झाल्याने शरीरावर ताण निर्माण झाल्याने रात्री शांत झोप येते. प्रत्येक आसन शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी पिळा देत तर कुठे ताण निर्माण करते. कधीही न वापरले गेले स्नायूची हालचा होऊ लागते. त्या त्या ठिकाणी रुधिराभिसरण व्यवस्थित होऊ लागते. पोटावर निर्माण होणाऱ्या अशा प्रकारच्या ताणामुळे पचनासाठी उपयोगी असा जो अग्नी असतो, त्याची कार्यक्षमता वाढते आणि भूक लागते तसच मल विसर्जन पण सुधारते. त्याच बरोबर योग्या त्या प्रकारचा आणि योग्य त्या प्रमाणातला आहार घेण्याची प्रवृत्ती पण वाढते. 

रिटायरमेंट नंतर, बऱ्याच लोकांना नवीन परिस्थीती सोबत जुळवून घेताना त्रास होतो. आपली ओळख गेल्याच्या भावनेतून ते लोकांमध्ये मिसळायचे कमी करतात. मग जसे वय वाढते तसे एकटेपणा येतो आणि त्यातून अनेक ज्येष्ठ दुःखी होतात आणि उर्वरित आयुष्य नैरश्यात जगतात. हे सगळे होते करण आपण आपल्या मनाच्या वृतिला, भावनांना नियंत्रणात नाही ठेवू शकत. 

योगश्चित्तवृत्तिनिरोधाः ll 

पतंजली ऋषींनी वरील सूत्रात सांगितले आहे की योग साधनेनी आपल्या मनात येणाऱ्या ज्या भावना आणि चंचल विचार आहेत, ते नियंत्रणात ठेवले जातात. कुठल्या ही भावनांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याऐवजी आपल्या मननी या सर्व भवनांनवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि हे योग साधनेतून ते शक्य होते. दुःख, निराशा, एकटेपणा या सर्व मानसिक चांचलतेतून निर्माण होणाऱ्या भावना आहेत. त्यावर नियंत्रण या साधनेतून प्राप्त होते. त्यामूळे तुम्ही आपल्या आयुष्य कडे एका वेगळ्या लेन्स मधून बघू लागता. श्वसनाच्या किंवा प्राणायामाचा अभ्यास केल्याने मन शांत होते आणि आपण उत्साही पण होते. साधे योग साधनेच्या निमित्याने वर्गासाठी एकत्र आल्यावर बाकी साधकांसोबत परस्परसंवाद होऊन पण एकटेपणा जाणार. 

अनेकदा आपण बघतो की वयानुसार काही ज्येष्ठ खूप रागीट बनतात, तिरस्कारी बनतात, तर काहींचा चटकन अपमान होऊन त्यांच्या अहंकारला तडा जातो. त्यावेळी ते घरच्यांवर राग आणि चिडचिड करतात. मग अशा स्वभावामुळे ज्येष्ठांचे जवळचे दुरावतात. पण हा दुरावा पण त्यांना सहन होत नाही. त्यावर योग साधना हा मार्ग आहे.

जसे जसे आपण योग साधनेत प्रगती करतो म्हणजेच आसने, श्वसनाचे प्रकर मग प्राणायाम मग धारणा- जप करायला लागतो तसे तसे आपली प्रकृती बदलायला लागते. मन एकाग्र होते, शांत होते, विनाकारण येणारा राग, होणारी चिडचिड कमी होते आणि आपल स्वास्थ्य उत्तम होत जाते. बरेचदा ज्येष्ठांची होणारी चिडचिड किंवा राग राग हा त्यांना असणाऱ्या एखाद्या शारारीक व्याधी मुळे आणि त्यातून होणाऱ्या अस्वस्थतेमुळे, त्रासामुळे पण असू शकतो. योग साधनेने हा त्रास कमी झाला की आपोआप स्वभाव आणि प्रकृती बदलायला लागते आणि घरच्यांना देखील तुमचा सहवास प्रिय वाटू लागतो.  

वय जसे वाढत तसे प्रत्येकाला एक भीती म्हणा किंवा चित्ता असते , ती म्हणजे ” माझा शेवट कसा होईल? अंतीमसमयी माझ्या जिवाला खूप त्रास तर नाही ना होणार?”  यावर योग साधना हाच मार्ग आहे. तर योग साधनेत अगदी समाधी मार्ग स्वीकारावा अशी प्रतेकाची इच्छा जरी नसली तरी ह्या मार्गावर वाटचाल करतांना म्हणजेच प्राणायाम, धारणा, ध्यान करताना समाधी पर भावना थोड्या वेळा करता जरी निर्माण झाल्या तरी आपली अयुर मर्यादा देखील वाढते आणि शेवट शांतीत आणि आरामात होतो..काही त्रास न होता.

तुम्ही साठी नंतर ही जर निरोगी आणि ॲक्टिव असाल तर उर्वरित आयुष्य पण निरोगीच राहण्याचा योग हा राज मार्ग आहे. 

तुम्ही जर आसनाचा अभ्यास करतच असाल तर नवीन आणि वेगळे आसन शिकू शकता. किंवा नेहमीच्या आसनात राहण्याचा कालावधी वाढवून शकता. आपल्या श्वासा कडे लक्ष केंद्रित करून त्याला नियंत्रणात आणून प्रत्येक आसनात शिथिल होण्याचा प्रयांत करू शकता. अशा प्रकारे स्वतःला आवाहन देऊन हा अभ्यास मनोरंजक करू शकता. 

हे सर्व करताना मात्र तज्ञ शिक्षकाचा मार्गदर्शन घेणं भाग आहे. T.v वर बघून , CDs वर बघून किंवा YouTube वर बघून आसनांचा अभ्यास करण चुक ठरेल. ह्या माध्यमातून सामान्य ज्ञान दिले जाते. तुमची वयक्तिक अडचण न बघता फक्ते हा अभ्यास केल्याने अपाय होण्याची शक्यता असते. असणाऱ्या व्याधी ह्या शिक्षकाला सांगितल्या की होणारा अपाय टळू शकतो. महत्त्वाचा म्हणजे तज्ञ शिक्षक तुमच वय, व्याधी बघून तुम्हाला रुजेल आणि झेपेल त्या गतीने शिकवणार.  

माझ्या वडिलांची आई.. माझ्या आजिनी असेच TV वर बघून काही आसन केले आणि दुसऱ्याच दिवशी तिला गुडघ्यात, पोट्रित खूप दुखून डॉक्टरांकडे जावे लागले. डॉक्टरांनी “खाली बसणे टाळा, कमोडचा वापर करा आणि पूर्णतः योगा बंद करा” असे सांगितले. माझी आजी कधीच नियमीत योगा न करणारी. एक दिवस तिला TV वरचा कार्यक्रम पाहून प्रेरणा झाली आणि त्याच्या त्या वेळी तिनी आसन करायला सुर्वात केली. खरं तर चुक ही योगा करण्याची नव्हती पण योग्य मार्गदर्शन न घेता आसन करण्याची होती. दुसरी चूक म्हणजे शरीर योगाभ्यासाठी तयार न करता अचानक योगाभ्यासतले कठीण आसनांन कडे ती गेली. आपण जसे शाळेत एक एक वर्ग पास करत करत वरच्या वर्गात जातो तसच योग साधनेच सुधा आहे. प्रत्येक पायरी ही चढली गेली पाहिजे. कठीण आसन घेण्या आधी सुधा त्याची पूर्व तयारी म्हणू काही आसन असतात ते करणं भाग असते. 

प्रत्येक व्यक्ती ही साधना करू शकत नाही कारण त्याला हा अभ्यास सुरू करताना काही अडथळे येतात.  पतंजली ऋषींनी अशा नऊ अडथळ्यांची नोंद घेतली आहे ..जे की तुम्ही पण अनुभवाल किंवा अनुभवले असतील..

व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतीभ्रान्तिदर्षनालब्ध 

भूमिकतत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्तेऽन्तरायाः ll 

व्याधी असणं, शरीराचा आणि मनातला आळस असणे, आपल्याला करता येईल का सारख्या शंका आणि संशय येणे आणि यामुळे हा अभ्यास थांबणे. असनांविषयी माहिती असून सुधा त्यांचा अभ्यास करतांना चुका करणे व चुका केल्यामुळे अभ्यास थांबवावं असे वाटणे, भास होणे व त्याचा चुकीचा अर्थ काढून अभ्यास थांबणे. आसनांचा परिणाम लवकर न दिसल्याने अभ्यास थांबायची इच्छा होते, घेतलेले आसन आदर्श अवस्थेत न घेता आल्यामुळे अभ्यास थांबवावं असे वाटणे किंवा घेतलेल्या आसनात स्थिर न थांबता आल्यानी अभ्यास थांबवावं असे वाटणे .. ह्या नऊ अडथळ्यांवर मात करतांना आपल शरीर आणि मन दुःखी व निराशा होते. एखादे आसन घेताना शरीर साथ देत नाही तेव्हा श्वासाची गती वाढून जीव घाबरतो. पण एकत्त्वभ्यासानी ह्या योग साधने वर विश्वास ठेवला तर आपण पुढे जातो आणि त्याचे फायदे आपल्याला दिसू लागतात. 

सामान्य व्यक्तीत आणि योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीत अनेक फरक हे नेहमीच आढळणार. दिवसाच्या शेवटपर्यंत उत्साह कायम ठेवणे, तणावग्रस्त परिस्थीती शांत राहू शकणे हे सर्व योग साधनेने शक्य होते.

सारांश करताना एक सांगते की सहनशक्ती, मनातील विचारांवर नियंत्रण ठेवून सकारात्मक विचार करणे, रोग प्रतिकारशक्ती आणि शाररिक बळ हे साठीनंतर अतिशय महत्त्वाचे आणि हे सर्व योग साधने मिळणार आहे.

तर ज्येष्ठांसाठी स्पेशल योगा क्लास मी सुरु करत आहे तो सुद्धा ऑनलाईन जो तुम्ही घर बसल्या करू शकाल. 

 निश्चय करून का न या मार्गाचा स्वीकार करावा आणि या क्लास ला नाव नोंदणी करा. अधिक माहिती करता ८७९३३१६२५४ वर संपर्क करा किंवा या लिंक वर क्लिक करून रजिस्टर करा  https://taplink.cc/carewithabha

– आभा देशमुख